नवी दिल्ली :देशभरातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे वातावरण आल्हाददायक राहिले आहे. उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान कार्यालयाच्या माहितीनुसार, दिल्लीत 14.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित : आयएमडीने म्हटले आहे की, 2 मे रोजी पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण-आंतरिक कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुढील 24 तासांत जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि तमिळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी गारपीट होऊ शकते :सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, अंतर्गत कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उर्वरित ईशान्य भारत, मराठवाडा आणि राजस्थान आणि गुजरातमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.