नवी दिल्ली : उत्तर भारतात पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण चांगलीच वाढली असताना आता भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसात उत्तराखंडमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर होणार मुसळधार :पश्चिम भारतात पुढील पाच दिवस कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस गुजरातमध्ये हीच स्थिती राहणार आहे. दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुढील तीन दिवस कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 'तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील किनारी प्रदेश आणि तेलंगणात पुढील दोन दिवसापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज :हिमाचल प्रदेशात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर हरियाणामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 14 आणि 17 जुलैला वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील पाच दिवसात अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.