कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना यंदा होणार आहे. तृणमूल काँग्रेस, भाजपनंतर आता काँग्रेसनंही 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती केली आहे.
काँग्रेसचे 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यात तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात लढतील. तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 291 उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता भाजपने आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्या दृष्टीने भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदु अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे.