अयोध्या (उत्तर प्रदेश) :अयोध्येच्यारामजन्मभूमी संकुलात रामलल्लाच्या जलाभिषेकासाठी 156 देशांतील नद्यांमधून आणलेले पवित्र पाणी शनिवारी अयोध्येत पोहोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक शनिवारी हे पाणी घेऊन कॅंट रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी पथकाचा ढोल - ताशांच्या गजरात सत्कार करण्यात आला. तसेच जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या गेल्या. रामलल्लाचा उद्या या पवित्र जलाने अभिषेक होणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहू शकतात.
156 देशांतील नद्यातून पाणी आणले : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी सांगितले की, 156 देशांसह सात महाद्वीपातील नद्यांचे पवित्र पाणी अयोध्येत आणण्यात आले आहे. सुमारे सहा महिने विविध देशांतील नद्यांचे पाणी घेण्याचे काम सुरू होते. दिल्ली स्टडी ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हिंदू देश असो, मुस्लिम देश असो की ख्रिश्चन देश, सर्व देशांतील नद्यांचे पाणी अयोध्येत आणले आहे. अगदी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नद्यांच्या पाण्याचाही यात समावेश आहे. पाणी आणणाऱ्या टीममध्ये सुमारे 50 सदस्यांचा समावेश होता.