चंदीगड :'वारिस पंजाब दे'चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा गेल्या 9 दिवसांपासून शोध सुरू आहे. पंजाब व्यतिरिक्त 5 राज्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे अमृतपालचे जॅकेट, चष्मा आणि ट्रॅकसूटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पटियाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अमृतपालला आश्रय देणाऱ्या महिलेला पतियाळा येथे अटक करण्यात आली आहे.
नेपाळ सीमेवर वॉन्टेड पोस्टर्स : आता अमृतपालच्या शोधासाठी नेपाळ सीमेवर वॉन्टेड पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये सापडले आहे. महाराजगंज हे नेपाळ उत्तर प्रदेश सीमेला लागून आहे. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अमृतपालने आपल्या खासगी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी शस्त्रे मागवली होती. ही शस्त्रे जम्मू - काश्मीरमार्गे पंजाबमध्ये पोहोचणार होती. अमृतपालला त्याच्या आनंदपूर खालसा फौज (AKF) आणि अमृतपाल टायगर फोर्स (ATF) या वैयक्तिक सैन्यांना प्रशिक्षित करायचे होते. त्यासाठी तो पाकिस्तानातील एका निवृत्त मेजरच्या संपर्कात होता.