शिलाँग/कोहिमा (मेघालय/नागालँड) : हाय-व्होल्टेज प्रचारानंतर, मेघालय आणि नागालँड या दोन ईशान्येकडील राज्यांमध्ये सत्तेची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यातील मतदार आज उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. दोन्ही राज्यांतील मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल.
मेघालयात 369 उमेदवार रिंगणात : मेघालयमध्ये, 10.99 लाख महिला आणि 10.68 लाख पुरुषांसह 21 लाख (21,75,236) मतदार 369 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. राज्यात सुमारे 81,000 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. राज्यातील 59 विधानसभा मतदारसंघातील 3,419 केंद्रांवर मतदान होणार आहे. मेघालयातील 60 विधानसभा मतदारसंघांपैकी 36 खासी, जयंतिया हिल्स प्रदेशात तर 24 गारो हिल्स प्रदेशात आहेत. राज्यात एकूण 369 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 36 महिला आहेत. एकूण उमेदवारांपैकी 44 अपक्ष आहेत.
बहुमताचा आकडा 31 : सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP), जी सत्तेत परत येऊ पाहत आहेत, तिला यावेळी सत्ताविरोधी घटकाचा सामना करावा लागू शकतो. 60 जागांच्या मेघालय विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 31 आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला 19 जागा, काँग्रेसला 21 आणि भारतीय जनता पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीने (UDP) सहा जागा जिंकल्या होत्या.
तृणमूल काँग्रेसचा उदय : राज्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता तरीही एनपीपीच्या नेतृत्वाखालील मेघालय लोकशाही आघाडीने (MDA) युडीपी, भाजप आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. यावेळी, भाजप आणि एनपीपीने निवडणूकपूर्व युती केलेली नाही. ते दोन्ही पक्ष एकट्याने लढत आहेत. भाजप आणि काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) 2021 मध्ये मेघालयातील 12 काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर मुख्य विरोधी पक्ष बनला आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा पक्षात सामील झाल्यानंतर तृणमूल एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आला आहे.
तृणमूल 60 पैकी 58 जागा लढवणार : राज्यात टीएमसीने 58 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा दक्षिण तुरा मतदारसंघातून उमेदवार आहेत. दादेंग्रेमध्ये काँग्रेसचे उमेदवार चेस्टरफिल्ड संगमा हे एनपीपीचे जेम्स संगमा यांच्याविरुद्ध लढत आहेत. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा तृणमूलच्या तिकीटावर टिकरिकिला आणि सोंगसाक या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. यूडीपीचे नेते मेटबाह लिंगडोह मैरांगमधून निवडणूक लढवत आहेत. यूडीपीचे उमेदवार टिटोस्टार वेल चायने सोहरामधून निवडणूक लढवत आहेत. तृणमूल काँग्रेसने नॉन्गथिम्मई येथून चार्ल्स पिंग्रोप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने दक्षिण शिलाँगमध्ये सॅनबोर शुल्लई आणि पश्चिम शिलाँगमध्ये अर्नेस्ट मावरी यांना उमेदवारी दिली.यूडीपीचे नेते लहकमेन रिम्बूई अमलारेममधून निवडणूक लढवत आहेत. सुतंगा सायपुंगमध्ये काँग्रेसने व्हिन्सेंट एच पाला यांना उमेदवारी दिली. यूडीपीचे उमेदवार किरमेन शिला हे ख्लीहरियातमधून निवडणूक लढवत आहेत.
सर्व पक्षांचा पूर्ण ताकदीनीशी प्रचार :एनपीपीपासून भाजपपर्यंत आणि काँग्रेसपासून तृणमूलपर्यंत, सर्व पक्षांनी राज्यात पूर्ण ताकदीनीशी प्रचार केला आहे. निवडणुकीतील आश्वासने असोत किंवा प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला चढवणे असो, कोणीही मागे हटले नाही. निवडणूक आयोगाने मेघालयमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 119 कंपन्या तैनात केल्या आहेत. मेघालयाचे मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोंगोर म्हणाले की, 640 मतदान केंद्रे असुरक्षित म्हणून गणल्या गेली आहेत, 323 गंभीर आहेत आणि 84 दोन्ही म्हणून गणल्या गेली आहेत.
नागालँडमध्ये 183 उमेदवार रिंगणात : नागालँडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार काझेटो किनीमी अकुलुटो जागेवरून बिनविरोध विजयी झाले आहेत. अशाप्रकारे भाजपने निवडणुकीपूर्वीच राज्यात आपले खाते उघडले आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत एकूण 183 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात निवडणुकीसाठी भाजपकडून 20, सीपीआय १, काँग्रेस २३, एनसीपी १२, एनपीपी १२, एनडीपीपी ४०, एनपीएफ २२, आरपीपी १, जदयू 7, एलजेपी (रामविलास) 15, आरपीआय (आठवले) 9, राजद (3), आणि अपक्ष 19, उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतमोजणी 2 मार्चला : यावेळी रिंगणात असलेल्या 183 उमेदवारांमध्ये केवळ चारच महिला आहेत. 1963 मध्ये स्थापन झाल्यापासून, नागालँडने 14 विधानसभा निवडणुका पाहिल्या आहेत, परंतु राज्यात अद्याप एकही महिला आमदार नाही. राज्यात एकूण 13,17,632 मतदार आहेत, त्यापैकी 6,61,489 पुरुष मतदार आणि 6,56,143 महिला मतदार आहेत. राज्यात विधानसभेच्या 60 जागा असून दोन्ही राज्यांतील मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे.
हेही वाचा :Khalistan In Punjab : पंजाबमध्ये 1980 च्या दशकाची पुनरावृत्ती? वेळीच पावले न उचलल्यास पुन्हा पेटेल पंजाब!