कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाघमुंडीमध्ये बोलताना तृणमूलवर निशाणा साधला. ममता यांनी राज्यात रोजगार निर्माण तर केले नाहीतच, मात्र ऑटोमोबाईल इंडस्ट्रीही राज्यातून बाहेर पाठवली. त्यामुळे 'तुम्हाला जर स्कीम्स हव्या असतील, तर तुम्ही भाजपाला मतदान करा; आणि जर स्कॅम्स हवे असतील तर तृणमूलला मतदान करा' असे मत शाहांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना शाहांनी प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला नोकरी, आणि स्थानिक भाषेमध्ये शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच, जंगलीमहाल परिसरात एआयआयएमएस उभारण्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले. तृणमूल सरकारने आतापर्यंत आदिवासी आणि कुर्मी जातीच्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जर भाजपा सत्तेत आले, तर प्रत्येक आदिवासी आणि कुर्मी कुटुंबाला एक-एक नोकरी मिळेल, असे शाह म्हणाले.