मुंबई -मुंबई वाहतूक पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयविरुद्ध कारवाई केली आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याबद्दल विवेक ऑबेरॉयला दंड ठोठावण्यात आला आहे. विवेक प्रमाणेच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आपल्या गाडीवरून फिरत होते. त्यांनी देखील हेल्मेट घातलेले नव्हते. मात्र, त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणात एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय, अशी चर्चा होताना दिसत आहे.
नियम मोडत राणा दाम्पत्याचा फेरफटका -
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वाराला मास्क आणि हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. राणा दामपत्याने विना मास्क व विना हेल्मेट अमरावतीत बुलटेवरून फेरफटका मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करत असताना आता पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.