बोलपूर (पश्चिम बंगाल) : विश्वभारती प्रशासनाने नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निवासस्थानी एक नोटीस लगावली आहे. बोलपूर उपविभागीय ग्रामीण न्यायालयातून ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसनुसार, अमर्त्य सेन यांच्या जमीन वादावर विश्वभारतीचे अधिकारी 19 एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेतील. विश्वभारती नुसार, अमर्त्य सेन यांच्या शांतिनिकेतनमधील 'प्रतिची' घरामध्ये 13 दशांश अतिरिक्त जमीन आहे, जी विश्वभारतीची आहे.
अमर्त्य सेन यांना विश्वभारतीची नोटीस ममता बॅनर्जी अमर्त्य सेन यांच्या पाठीशी : भारतरत्न अमर्त्य सेन यांच्यावर बेकायदेशीरपणे जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करत विश्वभारतीच्या अधिकाऱ्यांनी जमीन परत करण्याची मागणी करणारी 3 पत्रे पाठवली आहेत. विश्व भारतीच्या अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे अमर्त्य सेन यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी विश्वभारतीचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांनी तर अमर्त्य सेन यांच्यावर व्यक्तिगत हल्ला देखील केला आहे. मात्र दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अमर्त्य सेन यांच्या पाठीशी उभ्या आहेत. अमर्त्य सेन यांचे दिवंगत वडील आशुतोष सेन यांच्या मृत्यूपत्रानुसार 1.38 एकर म्हणजेच संपूर्ण जमीन अमर्त्य सेन यांच्या नावावर नोंदवली होती.
सेन यांच्या निवासस्थानी शांतता राखण्याचे निर्देश : प्रोफेसर सेन सध्या परदेशात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना शांतीनिकेतनच्या जमिनीवरून आणि घरातून बेदखल केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत 'प्रतिची'च्या देखभालीचे प्रभारी असलेले गीतकांत मुझुमदार यांनी बोलपूर उपविभागाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर लगेचच उपविभाग कार्यालयाच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. उपविभागीय दंडाधिकारी अयान नाथ यांनी शांती निकेतन पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अमर्त्य सेन यांच्या निवासस्थानी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. 6 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे लागू राहणार असून पोलिसांना या प्रकरणाचा नियमित अहवाल द्यावा लागणार आहे.
नोटीसमध्ये जमीन सरकारी मालमत्ता : नोटीसमध्ये 'ही जमीन सरकारी मालमत्ता आहे', असे म्हटले आहे. त्यामुळे ही जमीन ताब्यात घेता येणार नाही. या प्रकरणी प्रोफेसर अमर्त्य सेन यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ते स्वत: आले नाहीत किंवा आपला प्रतिनिधीही पाठवला नाही. या जमिनीबाबत विश्वभारती प्रशासन 19 एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेणार आहे. नोटीशीची ही प्रत बीरभूमचे जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, बोलपूर उपविभागीय दंडाधिकारी आणि शांतिनिकेतन पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. शुक्रवारी अमर्त्य सेन यांच्या 'प्रतिची' घराच्या गेटवरही ही नोटीस चिकटवण्यात आली होती.
हेही वाचा :Amit Shah On Mamata Banerjee : 2024 मध्ये भाजपला 35 जागा द्या, एका वर्षात ममता सरकार पडेल - अमित शाह