दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील आघाडीची विमानसेवा कंपनी असेलल्या एमिरेटस एअरलाईन्सने अलीकडेच एक नवी जाहिरात प्रसारीत केली आहे. यात एमिरेटसची एक केबिन क्रु मेंबर जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर उभी राहिल्याचे दिसते. ही जाहिरात खरोखरच बुर्ज खलिफावर चित्रीत करण्यात आली का अशी चर्चा नंतर लगेच सोशल मीडियात सुरू झाली आणि एमिरेटसने याचे उत्तर देत ही जाहिरात कशी चित्रीत करण्यात आली याचाही एक व्हिडिओ जारी केला.
जाहिरातीत दिसणारी एमिरेटसची क्रु मेंबर मुळात एक प्रोफेशनल स्कायडायव्हिंग इन्स्ट्रक्टर असून तिचे नाव निकोल स्मित-लुडविक असे आहे. जाहिरातीत ती काही फलके हातात घेतलेली दिसते. यावर एमिरेटससोबत तुम्हाला जगाच्या अत्युच्च टोकावर असल्याचा अनुभव येईल अशा आशयाचा मजकुर या फलकावर दिसतो. सुरूवातीला ती कुठे उभी आहे ते कळत नाही. मात्र नंतर जेव्हा कॅमेराद्वारे लाँगशॉट घेतला जातो तेव्हा ती बुर्ज खलिफावर उभी असल्याचे दिसून येते.