नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी सीमेवर मुक्काम ठोकून आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांच्या ठिकाणी तणाव निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांविरोधात स्थानिकांचे आंदोलन सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये धुमश्चक्री झाली. टिकरी आणि सिंघू सीमेवर स्थानिकांनी शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. हिंदुस्तान आता तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, असे पोस्टर्स घेऊन स्थानिक शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत आहेत.
सीमा खाली करण्याची आंदोलकांकडून मागणी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील 64 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज (शुक्रवार) पहाटे ३ पासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांची भूमिका -
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. काल (गुरूवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला होता. आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले.