महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

West Bengal Violence : पश्‍चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या नामांकनाला सुरुवात झाल्यापासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आज मतदानाच्या दिवशी राज्याच्या अनेक भागात अशांतता आहे. आत्तापर्यंत १५ जण ठार झाले आहेत.

West Bengal Violence
पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार

By

Published : Jul 8, 2023, 5:35 PM IST

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी रात्रीपासून राज्यात झालेल्या हिंसाचारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये तृणमूल कॉंग्रेस, भाजप, माकप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

मतपेट्या तलावात फेकल्या : कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा येथे मतपेटीत पाणी टाकल्यानंतर मतदान पुढे ढकलण्यात आले. मालदाच्या गोपालपूर येथे काँग्रेस आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हुगळीच्या धमसा येथील मतदान केंद्रावर तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीनंतर दोन मतपेट्या तलावात फेकल्या गेल्या. या प्रकरणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणाले की, 'तृणमूलचे गुंड आणि पोलिस एकमेकांना मिळालेले आहेत. त्यामुळेच इतक्या हत्या होत आहेत. हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत'.

केंद्रीय मंत्र्यांचा तृणमूल सरकारवर हल्ला : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बंगालमधील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'पश्चिम बंगालमधील संपूर्ण यंत्रणा असंवैधानिक कामात गुंतलेली आहे. तेथील सरकार ना राज्यपालांच्या आदेशाचा मान ठेवते ना उच्च न्यायालयाच्या आदेशाचा. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, पण तेथील सरकारने जनआधार गमावला आहे. त्यामुळे भीतीपोटी ते हिंसक झाले आहेत'.

'निवडणुकीच्या नावाखाली तमाशा चालू आहे' : पश्चिम बंगालमध्ये यावर्षीच्या पंचायत निवडणुकांदरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कूचबिहारच्या फालीमारी येथे एका मतदान केंद्रावर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात भाजप उमेदवाराचा पोलिंग एजंट ठार झाला. त्यानंतर बूथवरील मतदान थांबवण्यात आले. भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले की, 'केंद्रीय दले इथे आली होती. पण त्यांना बूथवर पाठवण्यात आले नाही. हा निवडणुकीच्या नावाखाली चाललेला तमाशा वाटतो. याला आपण सार्वजनिक निवडणूक म्हणू शकत नाही'.

केंद्रीय दलांचे अपयश - तृणमूलचा आरोप : दुसरीकडे या प्रकरणी तृणमूलने ट्विट केले की, 'रेजीनगर, तुफानगंज आणि खारग्राममध्ये त्यांच्या पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. भाजप, माकप आणि काँग्रेस केंद्रीय दलांच्या तैनातीचा आग्रह धरत आहे. आता त्यांची सर्वाधिक गरज असताना केंद्रीय दल कुठे आहेत?' पश्चिम बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले, 'पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका सुरू होण्याच्या एक रात्र आधी धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आल्या आहेत. नागरिकांचे संरक्षण करण्यात केंद्रीय दले का अपयशी ठरली आहेत, असा सवाल त्यांनी केला.

राज्यपालांचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र : पश्चिम बंगालमध्ये आज (8 जुलै) पंचायत निवडणूक 2023 होत आहे. राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यापासून झालेल्या हिंसाचारात किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याबाबत राज्यपालांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. बंगालमध्ये सुमारे 5.5 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी सुमारे 65 हजार केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील सुमारे 70 हजार पोलिस प्रशासनाचा कारभार सांभाळत आहेत.

हेही वाचा :

  1. West Bengal Violence : ममता सरकारला झटका, पंचायत निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दलाची तैनाती योग्य - सर्वोच्च न्यायालय
  2. West Bengal Violence : हिंसाचारावर उच्च न्यायालय कठोर, अहवाल मागवला ; ममता म्हणाल्या – विरोधी पक्ष जबाबदार

ABOUT THE AUTHOR

...view details