नवी दिल्ली - आज देशभरात कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली. देशात पहिल्यांदा अग्रभागी असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना म्हणजेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येत आहे. दिल्लीबरोबरच देशभरात इतरत्र ही लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आज एकूण ३२ राज्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी जरी लसीकरण होत असले तरी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. मात्र काही मान्यवर लस घेताना मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक वॅक्सिन घेतानाची खबरदारी पंतप्रधानांनी स्वतः अधोरेखित केली असूनही असे प्रकार दिसून आले.
पुनावाला, गुलेरिया यांनी घातला नाही मास्क
विशेष म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी आज कोरोनावरील लस घेतली. त्यांनीही तोंडावर मास्क घातलेला नव्हता. तसेच दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही लस घेतली. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क काढला होता. इतरही काही ठिकाणी असे खबरदारी न घेतल्याचे प्रकार आढळून आले. ही बाब आरोग्य नियमांचे उल्लंघन करणारी आहे असे पंतप्रधानांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले होते. त्यातच कोरोना विरुद्धच्या युद्धात ज्यांनी हिरीरीने काम केले त्या दोन प्रमुख कोरोना योध्यांनीच अशाप्रकारे मास्क काढून नियम डावलल्याचे दिसून आले. अदर पुनावाला हे तर भारतीय लस निर्मितीमधील अध्वर्यु आहेत. त्यांनीच मास्कशिवाय लस घेतली. दुसरी व्यक्तीही तितकीच महत्वाची म्हणजेच एम्सचे संचालक गुलेरिया. त्यांनीही मास्क काढल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर आहे असेच म्हणावे लागेल.