नवी दिल्ली Vinesh Phogat : कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आता विनेश फोगटनंही तिला मिळालेली पदकं परत करण्याची घोषणा केली आहे. विनेश फोगट तिचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करणार आहे. विनेशनं सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही माहिती दिली.
पंतप्रधानांना उद्देशून पत्र लिहिलं : विनेश फोगटनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे तिनं मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. विनेशनं आपल्या पत्रात म्हटलं की, साक्षी मलिकनं कुस्ती सोडली. बजरंग पुनियानंही त्याचं पद्मश्री परत केलं. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व का करायला लावलं, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. त्यामुळे ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. मी तुमच्या घरची मुलगी आहे. गेल्या एका वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.
हे खूप भीतीदायक आहे : विनेशनं पत्रात म्हटलं की, गेल्या काही वर्षांत महिला कुस्तीपटूंसोबत जे काही झालं, त्यामुळे आपण किती गुदमरून जगतोय हे समजलं असेल. फोगाट पंतप्रधानांना म्हणते की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील पाच मिनिटं काढा आणि त्या व्यक्तीनं (ब्रिजभूषण सिंह) मीडियात दिलेली विधाने ऐका. तुम्हाला कळेल की त्यानं काय केलं आहे. त्यानं महिला कुस्तीपटूंना 'मंथरा' म्हटलंय. शिवाय आम्हा महिलांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. हे खूप भीतीदायक आहे, असं विनेश फोगाट म्हणाली.