कानपूर देहात (उ. प्रदेश) : कानपूर देहात येथील गरीब कुटुंबाला जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून आता या घटनेत जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा नवा प्रकार समोर आला आहे. या घटनेत आपल्या मुलीसह जिवंत जाळण्यात आलेल्या प्रमिला दीक्षित ह्या घटनेपूर्वी तक्रार घेऊन डीएमकडे पोहोचल्या होत्या, मात्र तेथे त्यांचे कोणीही ऐकले नाही.
14 जानेवारीलाच डीएमकडे तक्रार : प्रमिला दीक्षित आपल्या कुटुंबासह 14 जानेवारी रोजी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात तक्रार घेऊन पोहोचल्या होत्या. कानपूर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या दरम्यान अधिकाऱ्यांनी उलट दीक्षित कुटुंबीयांवरच गुन्हा दाखल केला. दीक्षित कुटुंब जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून निराश होऊन परत आले आणि त्याच ठिकाणी झोपडीत राहू लागले. अधिकाऱ्यांची कारवाई इथेच थांबली नाही. महिनाभरानंतर 13 फेब्रुवारीला पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बुलडोझरसह मडौली गावात पोहोचले. यानंतर झोपडीला आग लागल्याने आई व मुलगी जिवंत जळाली.
पूर्वसूचना न देता बुलडोझर फिरवला :14 जानेवारी रोजी प्रमिला दीक्षित यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, त्यांनी कर्ज घेऊन घर बांधले आहे. त्यांच्या कुटुंबासोबतच त्यांच्या अनेक शेळ्याही तिथे राहत होत्या. जिल्हा प्रशासनाने कोणतीही सूचना न देता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. या वेळी प्रमिला यांनी प्रशासनावर आरोप करत 'आमची तक्रार ऐकण्यासाठी इथे कोणी नाही', असे म्हटले होते.