नवी दिल्ली:विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. ५ जुलैपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला मतदान होणार असून, त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.
घटनात्मक तरतुदी -घटनेच्या अनुच्छेद 66 मधील तरतुदींनुसार, उपराष्ट्रपतीची निवड निर्वाचक सदस्यांद्वारे केली जाते. अर्थात दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य यासाठी मतदान करतात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यसभेचे 233 निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे 12 नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार मतदान करू शकतात. यामध्ये एकूण 788 लोक मतदान करू शकतात. घटनेच्या अनुच्छेद 68 मध्ये असे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रिया विद्यमान उपराष्ट्रपतींची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्थात सध्या ही प्रक्रिया 10 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करावी लागेल.
नामांकन प्रक्रिया - निवडणुकीत उभे राहण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने किमान 20 संसद सदस्यांना प्रस्तावक म्हणून आणि किमान 20 संसद सदस्यांना समर्थक म्हणून नामनिर्देशित केले पाहिजे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्यासाठी 15,000 रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागते. नामांकन केल्यानंतर, निवडणूक अधिकारी नामनिर्देशनपत्रांची छाननी करतात आणि पात्र उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट केली जातात. रिटर्निंग ऑफिसरला लेखी नोटीस देऊन उमेदवारही अर्ज मागे घेऊ शकतो. उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. १९ जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 22 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.