नवी दिल्ली -महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 16 मार्च रोजी संपली. दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतल्या. त्यानंतर याबाबतचा निकाल घटनापीठाने राखून ठेवला आहे. या खटल्याची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली. त्यामध्ये सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबरोबर न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्णमुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, आणि न्यायमूर्ती पी. एस नरसिंह यांचा समावेश आहे. यातील न्यायमूर्ती शाह हे येत्या 15 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच लागेल असा अंदाज आहे. त्यामुळेच कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी येत्या 15-20 दिवसात सरकार कोसळेल अशाप्रकारचे वक्तव्य नुकतेच केले होते.
सुप्रीम कोर्टामध्ये पाच न्यायमूर्तींच्यापुढे हे प्रकरण पूर्णपणे सुनावणी झालेली आहे. त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने तत्पूर्वीच हा निकाल लागेल अशी शक्यता असल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून तेच होताना दिसत आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन राज्य सरकारला पाठिंबा देतील, अशा प्रकारच्या बातम्या आल्या. मात्र त्यावर स्वतः अजित पवार यांनीच स्पष्टीकरण देऊन आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र अजित पवार यांनी पत्र तयार केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन अजित पवार बाहेर पडणार असे मानण्यात येत होते. याप्रकारच्या वृत्तांमुळे राजकीय वर्तुळात मात्र वातावरण चांगलेच तापले होते.