नवी दिल्ली -कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. त्यानिमित्त देशभरात काल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत जनतेच्या सहकार्यानेच हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे आभार मानत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान -
देशाने काल 100 कोटी डोजचा टप्पा पार केला आहे. हा सर्व भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. जनतेच्या सहकार्यानेच हा महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला. १०० कोटी लसीचे डोस हा केवळ आकडा नसून देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. भारताने ज्या गतीने १०० कोटींचा टप्पा ओलांडला त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला भारताचे कसे होईल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. भारत या परिस्थितीचा सामना करु शकेल का, लस खरेदीसाठी भारत पैसे कुठून आणेल, भारत देशातील लोकांचे लसीकरण कसे करेल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आज हा १०० कोटी डोस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. भारताने आपल्या नागरिकांना १०० कोटी लसीचे डोस मोफत दिले आहे, असे पंतप्रधांनी म्हटले.
पुढे बोलताना ते म्हणाले, हे एक नवीन भारताचे चित्र आहे. आज अनेक जण भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहेत. भारतात लसीकरणात कोणातीही भेदभाव न करता, सर्वांचे सामान्य माणसाप्रमाणे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम वैज्ञानिक आधारावर विकसीत झाला असल्याचेही ते म्हणाले.