महाराष्ट्र

maharashtra

अखेर मोहीम फत्ते ; बोगद्यातील कामगारांना जीवदान मिळाल्यानंतर कुटुंबीयांचा जल्लोष, पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 11:30 AM IST

Uttarkashi Tunnel Rescue : सिलक्यारा बोगद्यातील 41 कामगारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे बोगद्यात अडकलेले कामगार बाहेर आल्यानंतर त्यांच्या घरी मोठा जल्लोष करण्यात आला. बचावलेल्या कामगारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरध्वनीवर संवाद साधला.

Uttarkashi Tunnel Rescue
संपादित छायाचित्र

देहरादून Uttarkashi Tunnel Rescue :उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेली मोहीम फत्ते झाली आहे. या 41 कामगारांना जीवदान मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा जल्लोष केला. यावेळी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बचाव पथकाचं कौतुक केलं. यावेळी बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या कामगारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरध्वनीवरुन संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून या बचावकार्याचं अपडेट घेत होते. कामगार सुखरुप आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून बचाव पथकाचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद :सिलक्यारा बोगद्यात 28 नोव्हेंबरपासून 41 कामगार अडकले होते. गेल्या 17 दिवसांपासून या कामगारांच्या सुटकेसाठी बचावकार्य करण्यात आलं. मात्र तरीही बचावकार्यास यश येत नसल्यानं संपूर्ण देश हादरला होता. मात्र 17 व्या दिवशी या बचावकार्यास यश आल्यानं देशभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी बोगद्याच्या आवारातच छोटेखानी रुग्णालय बांधण्यात आलं. बचावलेल्या कामगारांना थेट रुग्णालयात नेण्यासाठी 41 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोगद्याच्या आवारात आरोग्य तपासणी करुन या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धाडसी कामगारांशी दुरध्वनीवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या कामगारांचं कौतुक केलं.

बचावलेल्या कामगारांच्या घरी जल्लोष : सिलक्यारा बोगद्यातून बचावण्यात आलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांचा गेल्या 17 दिवसांपासून जीव टांगणीला लागला होता. अखेर या कामगारांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार इथले असलेले रहिवासी माणिक तालुकदार यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवर त्यांच्यासोबत संवाद साधत जल्लोष केला. तर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथले रहिवासी मनजीत यांचीही सिलक्यारा बोगद्यातून सुखरूप सुटका करण्यात आली. मनजीतचे वडिलांनी "माझा मुलगा सुखरूप बचावला. याचा मला खूप आनंद आहे. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो" असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

ओडिशा, आसाममध्येही जल्लोष : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांमध्ये देशभरातील कामगार अडकले होते. यात ओडिशातील मयूरभंज इथले धीरेन नाईक यांनी 17 दिवस सिलक्यारा बोगद्यात काढले आहेत. मात्र त्यांची बोगद्यातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी जल्लोष केला. धीरेन नाईक यांच्या आईनं बोगद्यातून कामगारांना वाचवल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. तर आसाममधील कोक्राझार इथले रहिवासी रामप्रसाद नरझारी यांच्या कुटुंबीयांनी ते सुखरुप बाहेर आल्याबद्दल जल्लोष केला. रामप्रसाद नरझारी यांच्या वडिलांनी "सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणानं बाहेर काढल्याबद्दल मी भारत सरकार आणि आसाम सरकारचे आभार मानतो. बोगद्यातून कामगारांना रुग्णालयात नेण्यात आल्याचं ऐकून मला दिलासा मिळाला" असं सांगितलं आहे. तर " पतीची 17 दिवसानंतर सिलक्यारा बोगद्यातून सुटका झाली, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्यासाठी भारत सरकारचे आभार मानते " असं रामप्रसाद नरझारी यांच्या पत्नीनं यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. उत्तराखंडच्या बोगद्यात कामगार कसे अडकले? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर
  2. हायटेक मशिनरींना जे जमलं नाही ते भारतीय सैन्यानं करुन दाखवलं; चक्क डोंगर हातांनी फोडला!
  3. सिलक्यारा बोगदा बचाव कार्य ठरली जगातील सर्वात मोठी तिसरी मोहिम, पहिले दोन बचाव कार्य कोणते?

ABOUT THE AUTHOR

...view details