उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Collapsed :उत्तरकाशी यमुनोत्री महामार्गावर निर्माणधीन बोगद्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. उत्तराखंडसह झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल आणि ओडिशातील सुमारे 40 मजूर उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात अडकले आहेत. चांगली बाब म्हणजे बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क झाला आहे. घटनास्थळी तैनात पीआरडी जवान रणवीर सिंह चौहान यांनी सांगितलं की, बचावकार्य वेगानं सुरू आहे. संबंधित कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याशिवाय शासन आणि प्रशासनही घटनास्थळी ठाण मांडून आहे.
बोगद्यात अडकलेल्या लोकांशी बोललो : जवान रणवीर सिंह चौहान म्हणाले की, सुरक्षा विभागाच्या लोकांनी बोगद्यात अडकलेल्या लोकांशी चर्चा केली. आमचा आवाज बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. ते यापुढं खाद्यपदार्थ पाठवू नका असं सांगत आहेत. तसंच, बोगद्यात अडकलेले लोक उष्णतेबद्दल बोलत आहेत. सध्या बोगद्यात 205 मीटरचे काम सुरू आहे. बोगद्यात अडकलेले लोक 270 मीटरवर आहेत. अजून 65 मीटरचा बोगदा उघडायचा आहे. बघूया बोगदा उघडायला किती वेळ लागतो. बोगद्यात अडकलेले लोक सुखरूप राहावेत, अशी आम्ही देवाकडं प्रार्थना करतो.
बोगद्यात अडकलेल्या लोकांना ऑक्सिजनची मागणी : ते पुढं म्हणाले की सुरुवातीला आम्ही निराश झालो होतो. आत अडकलेल्या लोकांशी संपर्क साधू शकलो नाही. सगळे घाबरले होते. रात्री 11 वाजता बोगद्यात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात आल्याचं सांगितलं. आत किती लोक होतं, तेही आम्ही लिहून पाठवलं होतं. तसंच लेखी कागदपत्रं शोधण्याबाबत माहिती दिली. जे अन्न पाठवले होते ते मिळत आहे. ते खाल्ल्याचंही बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी सांगितलं.