देहराडून Uttarkashi Tunnel Accident :सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अद्यापही या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आलं नाही. सिलक्यारा इथल्या बोगद्यात अडकलेल्या काही मजुरांना अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांच्यासाठी बोगद्यात काही औषधं पाठवण्यात आली आहेत. बोगद्यात अस्वस्थ वाटल्यानंतर काही कामगारांना झोपही लागली नाही. एवढचं नाही तर अन्नामध्ये सतत फायबरच्या कमतरतेमुळे कामगारांना डोकंदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्यांना सामोरं जावं लागलं आहे.
कामगारांची जीवन मृत्यूशी झुंज : उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात मागील 8 दिवसापासून 41 कामगार जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी विविध मशीनचा वापर करण्यात येत आहे. कामगारांना वाचवण्यासाठी शनिवारी इंदूरहून मदत मागवण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सैन्यानंही मोहीम हाती घेतली आहे. सैन्याचे जवान बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करतील, अशी आशा आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना दैनंदिन गोष्टीसाठीही संघर्ष करावा लागत आहे.
सुका मेवा खाल्ल्यानं होत आहेत अडचणी : बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काजू, बदाम, पॉपकॉर्न, कुरकुरीत पदार्थ खाण्यासाठी पाठवले जात आहेत. पाईपद्वारे कोणत्याही प्रकारचं अन्न पाठवणं शक्य नाही. त्यामुळे कामगारांना मागील 8 दिवस या यंत्रणेसोबतच जगावं लागत आहे. मजुरांना सकाळ संध्याकाळ सुका मेवा खावा लागतो. त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडणं साहजिक आहे. कामगारांना पाणी, ओआरएस आणि ज्यूस पिण्यासाठी पाठवले जात आहेत. काही कामगारांनी शनिलारी त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलले असून येथील अनेकांची प्रकृती खालावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बहुतेक कामगारांना पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आर सी एस पनवार यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागानं काही औषधं आत पाठवली आहेत.