उत्तरकाशी World Longest Rescue Operation Uttarkashi : हिमालयात वसलेल्या उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची 17 व्या दिवशी सुखरूप सुटका करण्यात आलीय. देश-विदेशातील तज्ज्ञ रात्रंदिवस या बचावकार्यात गुंतले होते. अखेर 17 व्या दिवशी रॅट मायनिंग खाण तंत्राचा वापर करुन मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे मलबा बाहेर काढण्यात आला. इतिहासावर नजर टाकली तर या बचाव मोहिमेचं देशातलं पहिलं आणि जगातलं तिसरं सर्वात लांब 'रेस्क्यू ऑपरेशन' म्हणून नोंद झालीय.
बचाव मोहिमेसाठी यूपीतून रॅट मायनिंग तंत्रज्ञानांची तज्ज्ञ टीम मागवण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास बोगद्यात लाइफलाइन पाईपही टाकण्यात आला. तो पाईप सातच्या सुमारास फुटला. यानंतर एनडीआरएफचे जवान पाईपद्वारे कामगारांपर्यंत गेले. 45 मिनिटांत सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं 17 दिवस बोगद्यात कैद असलेले सर्व 41 कामगारांची प्रकृती उत्तम आहे.
ग्राफिक्सच्या माध्यमातून उत्तरकाशी बोगदा अपघात समजून घ्या जगातलं तिसरं मोठं बचाव कार्य : उत्तराखंडात पाऊस आणि भूस्खलनादरम्यान लहान-मोठे बचावकार्य होतच असतात. पण उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 जणांची सुटका हे भारतातलं पहिलं आणि जगातलं तिसरं मोठं बचाव कार्य ठरलंय. ही बचाव मोहिम महत्त्वाचा होती. कारण अत्यंत कठीण परिस्थितीत सर्व यंत्रणेकडून 41 लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू होते. उत्तरकाशीचं हे रेस्क्यू ऑपरेशन जगभरात चर्चेचा विषय बनला होता. हे रेस्क्यू ऑपरेशन जगातील तिसरं मोठं बचाव कार्य ठरलंय. याआधीही जगातील दोन वेगवेगळ्या भागात अशाच प्रकारचे बचावकार्य झाले आहे. तर चौथं रेस्क्यू ऑपरेशन हे 14 दिवस चाललं.
जगातलं पहिलं सर्वात लांब बचाव कार्य : जगातलं सर्वात दीर्घकाळ चाललेलं बचाव कार्य सुमारे 13 वर्षांपूर्वी 2010 मध्ये दक्षिण अमेरिकन देश चिली इथं झालं होतं. 5 ऑगस्ट 2010 रोजी सोन्याच्या खाणीचा मुख्य भाग कोसळल्यानं 33 कामगार बोगद्यात अडकले होते. हे ऑपरेशन इतकं धोकादायक होतं की, खाणीत अडकलेले कामगार जिवंत बाहेर येण्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हा बचाव एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 69 दिवस चालले. अखेर 69 व्या दिवशी 33 कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली होती. या बचाव मोहिमेची जगभरात चर्चा झाली. हे कामगार 2300 फूट खोल बोगद्यात अडकले होते. 18 दिवस काहीही खाल्ल्याशिवाय बोगद्यात राहिले होते. या यशस्वी ऑपरेशननंतर त्यावर अनेक चित्रपटही बनले.
जगातलं दुसरं सर्वात लांब बचाव कार्य : 2018 मध्ये थायलंडमधील बचाव कार्य चर्चेत राहिलं. 23 जून 2018 रोजी अचानक आलेल्या पुरामुळं कनिष्ठ फुटबॉल संघाचे 12 खेळाडू आणि एक प्रशिक्षक बोगद्यात अडकले होते. थायलंड सरकारला या घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव मोहीम सुरू करण्यात आली. हे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक ज्युनियर असोसिएशन फुटबॉल संघाचे सदस्य होते. ते लुआंग गुहेत प्रवेश करत होते. मात्र, अचानक मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण होऊन गुहा पाण्यानं भरली. त्यामुळं सर्व रस्ते बंद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक 9 दिवस गुहेत खेळाडूंचा शोध घेण्यात व्यस्त होते. या बचाव कार्यात सुमारे 10 हजार लोकांनी भाग घेतल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ थायलंडच नाही तर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि जगभरातील अनेक तज्ज्ञांनी या बचाव कार्यात भाग घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व खेळाडू 18 दिवस काहीही न खाता सुरक्षित राहिले होते.
जगातलं चौथं सर्वात लांब बचाव कार्य : 25 एप्रिल 2006 रोजी ऑस्ट्रेलियातील तस्मानिया इथं झालेल्या भूकंपामुळं अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तेव्हा अशाच बचाव कार्यात दोन लोकांचे प्राण वाचले होते. दरम्यान, 34 वर्षीय टॉड रसेल आणि 37 वर्षीय ब्रेंट वेब हे सोन्याच्या खाणीत सुमारे एक किलोमीटर खाली गेल्यानंतर अडकले. सुरुवातीला असं मानलं जात होतं की दोघेही आपत्तीचे बळी ठरले आहेत. मात्र, खाली खाणीत कॅमेरा लावला असता दोघंही जिवंत असल्याचे दिसून आलं. हा बचाव पूर्ण करण्यासाठी एजन्सींना 14 दिवस लागले. दोघंही बाहेर पडताच संपूर्ण शहरात जल्लोष झाला.
- गेल्या काही वर्षांतील या बचाव कार्यांवर नजर टाकल्यास उत्तराखंडातील उत्तरकाशी बचाव कार्य तिसऱ्या क्रमांकावर ठरले आहे. उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बोगद्याच्या आतून बाहेर काढण्यासाठी देश-विदेशातील अवजड यंत्रणा तैनात करण्यात आली होती. अखेर 17 व्या दिवशी ऑपरेशन यशस्वी झाले. सर्व कामगार सुखरुप बाहेर आले. देशवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा :
- हायटेक मशिनरींना जे जमलं नाही ते भारतीय सैन्यानं करुन दाखवलं; चक्क डोंगर हातांनी फोडला!
- उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन फत्ते; बोगद्यातील सर्व 41 कामगारांना काढलं सुरक्षित बाहेर, रॅट मायनिंगचा केला वापर
- उत्तराखंडच्या बोगद्यात कामगार कसे अडकले? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर