उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Silkyara Tunnel Rescue: सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार अडकले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी मंगळवारी रात्रभर ड्रिलिंगचं काम सुरू होतं. बोगद्यात आत्तापर्यंत सहा 800 मिमी पाईप ऑगर मशीननं टाकण्यात आले आहेत. सिलक्यारा बोगद्यात 36 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं असून सातव्या पाईपचं वेल्डिंगचं काम सुरू आहे. ड्रिलिंग सकारात्मक दिशेनं जात आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास बचाव कार्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिलक्यारा बोगद्यात कोसळली दरड: महामार्गावर निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात 12 नोव्हेंबरला भूस्खलन झाल्यानं 41 मजूर आत अडकले होते. या कामगारांना वाचवण्यासाठी आधी ढिगारा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. त्यानंतर ऑगर मशिननं खोदकाम सुरू करण्यात आलं. केवळ 7 मीटर ड्रिलिंग केल्यानंतर मशीनची क्षमता कमी असल्याचं आढळल्यानं ते काढावं लागलं. यानंतर कामगारांच्या बचावासाठी अमेरिकन ऑगर मशीननं हे काम सुरू करण्यात आलं.
कृती आराखड्यावर काम सुरू : अमेरिकन ऑगर मशीनच्या सहाय्याने बोगद्यात ड्रिलिंग करताना कंपन आणि दरड पडण्याचा धोका होता. यानंतर खोदकामही बंद करण्यात आलं आहे. या मशिनने 22 मीटर खोदकाम केल्यानंतर काम थांबवावं लागलं. यानंतर कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी इतर पर्यायांवर काम सुरू झालं. त्याअंतर्गत 6 कृती आराखड्यांवर काम सुरू आहे.