उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या १७ व्या दिवशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची यशस्वीपणे सुटका करण्यात आल्यानं केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आनंद व्यक्त करण्यात आला. या बचाव कार्यावर पीएमओच्या वतीनं वरिष्ठ आयएएस अधिकारी भास्कर खुल्बे देखरख ठेवून होते. तर त्यांच्या मदतीला होते, ऑस्ट्रेलियाहून आलेले इंटरनॅशनल टनेलिंग एक्सपर्ट अर्नॉल्ड डिक्स. डिक्स यांचं या बचावकार्यात मोठं योगदान आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलं कौतुक : कामगारांची बोगद्यातून सुखरुप सुटका झाल्यानंतर अर्नॉल्ड डिक्स यांचं सर्वत्र कौतुक होतंय. स्वत: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही त्यांचं अभिनंदन केलं. या कौतुकानं ते भारवून गेले आहेत. यावेळी बोलताना डिक्स म्हणाले की, "आम्ही ४१ लोकांचं प्राण वाचवलं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. सर्व सुखरूप बाहेर आले याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही काय करत आहोत हे आम्हाला माहित होतं. भारताचे सर्वोत्तम अभियंते बचाव कार्यात गुंतले होते. याशिवाय भारतीय सैन्यानं आणि इतर यंत्रणांनी मोठं काम केलं. ज्यामुळे हे यश मिळालं", असं त्यांनी नमूद केलं.
रोज बोगद्याच्या मंदिरात प्रार्थना : बचाव कार्यादरम्यान अर्नॉल्ड डिक्स रोज बोगद्याच्या मंदिरात प्रार्थना करत असत. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, "मी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना सुखरूप परत आणण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होतो". ते पुढे म्हणाले की, "बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. मात्र आता सर्वकाही यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. ४१ लोकांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आलं. याचा मला खूप आनंद आहे", असं ते म्हणाले.