देहराडून : कैलास मानसरोवर यात्रा सलग चार वर्षापासून स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तराखंड पर्यटन विभाग भाविकांना जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास पर्वताची झलक दाखवण्याचा नवा मार्ग शोधत आहेत. जुने लिपुलेख शिखर हे तिबेटचे प्रवेशद्वार असलेल्या लिपुलेख खिंडीच्या पश्चिमेला आहे. कैलास मानसरोवर यात्रा लिपुलेख पास मार्गे शेवटची 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारामुळे ती स्थगित करण्यात आली होती. तेव्हापासून ती सतत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचा नवा मार्ग शोधत असल्याची माहिती उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास दर्शन :अलीकडेच पर्यटन विभागाचे अधिकारी, जिल्हा अधिकारी, साहसी पर्यटन तज्ज्ञ आणि सीमा रस्ते संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने जुन्या लिपुलेख शिखराला भेट दिली. येथून भव्य कैलास पर्वत दिसतो. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक पर्यटन म्हणून कसे विकसित करता येईल याचा शोध घेता येईल, अशी माहिती धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी देवेश शशानी यांनी वृत्तसंस्थेला दिली. देवेश शशानी देखील त्या टीमचा एक भाग होते. जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास दर्शन हा कैलास मानसरोवर यात्रेचा पर्याय असू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.