हैदराबाद- उत्तराखंडमध्ये पाचव्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहेत. काँग्रेस व भाजप या दोन मुख्य पक्षातील काही उमेदवार असे आहेत ज्यांनी आजपर्यंत विधानसभा निवडणुकीत आपले गड राखून ठेवले आहेत. राज्याच्या राजकारणात या नेत्यांना मतदारसंघातील लोकांनी डोक्यावर घेतले आहे. जनमतांच्या जोरावर आजपर्यंत ते अजिंक्य राहिले आहेत.
बिशन सिंह चुफाल - बिशन सिंह चुफाल हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते पिथौरागड जिल्ह्यातील डीडीहाट विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. डीडीहाट विधानसभा मतदार संघावर भाजपचा कब्जा आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह डीडीहाट मतदारसंघात राहतात, यामुळे हा भाजपचा गड समजला जातो. स्वतंत्र उत्तराखंड झाल्यानंतर चारही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे बिशन सिंह चुफाल हे विजयी झाले. 2017 साली बिशन सिंह यांनी किशन भंडारी यांचा 2 हजार 368 मतांनी पराभव केला. आमदार बिशन सिंह चुफाल हे खंडूरी व निशंक सरकारमध्ये मंत्री होते. 2017 मध्ये त्रिवेंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद होते व धामी सरकारमध्येही त्यांनी मंत्रीपद भुषवले. यंदाच्या निवडणुकीत बिशन सिंह चुफालच्या विरोधात काँग्रेसने प्रदीप सिंह पाल यांना तिकीट दिले आहे.
गोविंद सिंह कुंजवाल - अल्मोडा जिल्ह्याच्या जागेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते गोविंद सिंह कुंजवाल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्याच्या स्थापनेपासून जागेश्वर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. विधानसभेचे माजी सभापती गोविंद सिंह कुंजवाल हे मागील चार विधानसभा निवडणुकीत जागेश्वर मतदारसंघातून येत आहेत. 2017 च्या निवडणुकीवेळी गोविंद सिंह कुंजवाल यांनी भाजप उमेदवार सुभाष पांडेय यांचा केवळ 400 मतांनी पराभव केला होता. यावेळी कुंजवाल यांच्या विरोधात भाजपचे मोहन सिंह शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोण निवडून येईल, याकडे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहेत.
प्रीतम सिंह- प्रीतम सिंह हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असून विधासभेचे विरोधी पक्षनेते आहे. डेहराडून जिल्ह्याच्या चकराता विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. चकराता ब्रिटिशकालीन शहर असून एक पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौदर्यंतेसह याठिकाणची नृत्य कला, संस्कृतीसाठीही चकराता प्रसिद्ध आहे. चकराता विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. 2002 पासून ते आजतागायत प्रीतम हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. प्रीतम सिंह यांनी 2007, 2012 व 2017 च्या विधानसभा मतदानावेळी आपल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली होती. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा खूप प्रयत्न केला. प्रीतम सिंह यांच्यासमोर भाजपने मुन्ना सिंह चौहान यांच्या पत्नी मधू चौहान यांना उमेदवारी दिली आहे. गत निवडणुकीत प्रीतम सिंह यांनी भाजपच्या मधू यांचा 1 हजार 543 मतांनी पराभव केला. 2017 ची निवडणूक जिंकून प्रीतम सिंह चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले.
हरभजन सिंह चीमा - उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर विधानसभा मतदार संघाला मिनी पंजाब म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी आजही भाजप शिरोमणी अकाली दलास समर्थन करते. राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत या मतदारसंघात शिरोमणी अकाली दलचे प्रदेशाध्यक्ष हरभजन सिंह चीमा हेच आमदार आहेत. आता त्यांनी आपल्या मुलाला त्रिलोक सिंह चीमाला मैदाना उतरवले आहे. त्रिलोक सिंह चीमा हे भाजपच्या चिन्हावर यंदा पहिल्यांच निवडणूक लढवत असून वडिलाप्रमाणे अजिंक्य राहण्याचा प्रयत्न करत आहे.