महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंड : गेल्या 21 वर्षात 10 मुख्यमंत्री; एकानेच केला कार्यकाळ पूर्ण - उत्तराखंडचा राजकीय इतिहास

उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींनी वातावरण तापलं आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री तीरथसिंह रावतांचा यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता कोणाच्या हाती सोपवण्यात येणार अद्याप स्पष्ट नाही. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला. आतापर्यंत उत्तराखंडला 11 मुख्यमंत्री लाभले आहेत.

Uttarakhand
उत्तराखंड

By

Published : Jul 3, 2021, 8:20 AM IST

डेहराडून - उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. भाजपाकडून मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता कोणाच्या हाती सोपवण्यात येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.

उत्तर प्रदेशमधून विभाजन झाल्यावर 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे नित्यानंद स्वामी होते. ज्यांनी 11 महिने 20 दिवस मुख्यमंत्री पद सांभाळले. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी हे चार महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले होते.

एकाच मुख्यमंत्र्याने कार्यकाळ पूर्ण केला -

2002 मध्ये निवडणूक घेतल्यानंतर काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले होते. 2002 ते 2007 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2007 मध्ये निवडणूक घेतल्यानंतर भाजपाचे भुवनचंद्र खंडुरी मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर पुन्हा रमेश पोखरियाल निशंक यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 11 स्पटेंबर 2011 ला पुन्हा निशंक यांच्या राजीनाम्यानंतर खंडुरी मुख्यमंत्री झाले.

25 दिवस राष्ट्रपती राजवट -

2012 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. तेव्हा विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. बहुगुणा यांनी 22 महिने मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा 34 महिन्यांसाठी हरीश रावत मुख्यमंत्री झाले. हरीश रावत यांच्याविरोधात पक्षाच्या 9 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही राष्ट्रपती राजवट 25 दिवस होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर हरीश रावत यांचे सरकार होते. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवत त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री केलं. तर पुन्हा 47 महिने आणि 20 दिवस सत्तेत राहिल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांची राजीनामा घेत भाजपाने गेल्या मार्च महिन्यात तिरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्री केले होते.

तीरथसिंह रावत यांचा राजीनामा -

तीरथसिंह रावत यांनी 10 मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घेण्याचा नियम होता. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला होता. सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे.

पुढचा मुख्यमंत्री कोण?

तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याने राज्याचा पुढचा प्रमुख कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराच्या नावाचा निर्णय भाजपा विधिमंडळ मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक, राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी, सतपाल महाराज, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत, कॅबिनेट मंत्री बंशीधर भगत, राज्यमंत्री डॉ धनसिंग रावत, कॅबिनेट मंत्री बिशनसिंग चुफाल, पुष्करसिंग धामी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. तसेच तीरथ यांच्या आधी मुख्यमंत्री असलेले त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याकडे सत्ता सोपविण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

उत्तरांखड विधानसभा संख्याबळ -

70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आता आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होईल. राज्यात सत्तेत येण्यासाठी 21 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. भाजपा सरकारला कोणताही धोका नसला तरी पक्षांतर्गत धुसपूस गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचं दिसून येत होतं.

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ -

  1. नित्यानंद स्वामी - 9 नोव्हेंबर 2000 ते 29 ऑक्टोबर 2001
  2. भगतसिंग कोश्यारी 30 ऑक्टोबर 2001 ते 01 मार्च 2002
  3. एनडी तिवारी - 2 मार्च 2002 ते 7 मार्च 2007
  4. भुवनचंद्र खंडूरी - 8 मार्च 2007 ते 23 जून 2009
  5. रमेश पोखरियाल निशंक - 24 जून 2009 ते 10 सप्टेंबर 2011
  6. भुवनचंद्र खंडूरी - 11 सप्टेंबर 2011 ते 13 मार्च 2012
  7. विजय बहुगुणा - 13 मार्च 2012 ते 31 जानेवारी 2014
  8. हरीश रावत - 1 फेब्रुवारी 2014 ते 27 मार्च 2016/ 21 एप्रिल 2016 ते 22 एप्रिल 2016/11 मे 2016 ते 18 मार्च 2017
  9. त्रिवेंद्र सिंग रावत - 18 मार्च 2017 ते 9 मार्च 2021
  10. तीरथसिंग रावत - 10 मार्च 2021 ते 2 जुलै 2021

ABOUT THE AUTHOR

...view details