नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, एक दिवस देशाच्या राजकारणातून अशा कुटुंबाच्या राजकारणाचा 'सूर्यास्त' नक्कीच होईल. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत देशातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून भविष्याकडे लक्ष वेधले आहे. पंतप्रधानांनी घराणेशाहीचे राजकारण ही सर्वात मोठी चिंता असल्याचे सांगितले तसेच याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही कुटुंबाच्या विरोधात आहेत किंवा त्यांचे कोणाशी वैयक्तिक वैर आहे असेही त्यांनी स्पष्ट केले .
मला लोकशाहीची चिंता
पंतप्रधान म्हणाले, “मला लोकशाहीची चिंता वाटते. घराणेशाहीच्या राजकारणाने राज्यांचे नुकसान केले आहे. मतदारांना हे समजले आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीत लोकशाहीची ताकद बळकट केली आहे. ते म्हणाले, 'एक दिवस असा येईल, जेव्हा भारतातील घराणेशाहीच्या राजकारणाचा सूर्यास्त देशातील नागरिक करतील. या निवडणुकीत देशातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवत पुढे काय होणार आहे, याचे संकेत दिले आहेत.
विरोधकांच्या बेजबाबदार वृत्तीचे दर्शन
कोरोना लसीकरणावरील प्रश्न असो किवा युक्रेनच्या संकटाच्या काळात तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मोहिमेत विरोधकांनी बेजबाबदार वृत्तीचे दर्शन दिसल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशातील नागरिकांचे रक्षण केले पण अतिशय जबाबदारीने सांगतोकी, काही लोक राजकारणाची पातळी सतत खालावत आहेत. 'या लोकांनी ऑपरेशन गंगालाही राज्याच्या बेड्यांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक योजनेला, प्रत्येक कामाला प्रादेशिकता आणि जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आणि हाच भारताच्या उज्वल भवितव्यासाठीचा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी...
भ्रष्टाचाराविरोधातील स्वतंत्र एजन्सींची कारवाई थांबवण्याचा आणि त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोपही पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केला. 'आज न्याय्य संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात, तेव्हा त्यांची बदनामी करण्यासाठी भ्रष्ट तसेच घोटाळ्यांनी वेढलेले लोक एकत्र येऊन या संस्थांवर दबाव आणतात. अशा लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरही विश्वास नसतो आणि ते भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धच्या न्यायालयीन कारवाईला धर्म, राज्य आणि जातीचा रंग देऊ लागतात 'असे भ्रष्ट, माफिया तुमच्या समाजातून, पंथातून, जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करा. जाती, पंथाची बदनामी करणाऱ्यांपासून दूर राहावे लागेल, विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
जनतेने विकासाचे राजकारण निवडले
पंतप्रधान म्हणाले की, काही लोक उत्तर प्रदेशची बदनामी करतात आणि इथल्या निवडणुकीत जातीचाच वरचष्मा असतो असे सांगतात. '2014 चा निकाल बघा, 2017 असोकी 2019 चा निकाल आणि आता पुन्हा 2022 मध्येही... प्रत्येक वेळी उत्तर प्रदेशच्या जनतेने विकासाचे राजकारण निवडले आहे'.
जनतेचा एकतर्फी आशीर्वाद
तत्पूर्वी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, आज जे निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने एकतर्फीपणे आले आहेत. यात आम्हाला चार राज्यातील जनतेचा एकतर्फी आशीर्वाद मिळाला आहे. यात भारतातील जनतेने पंतप्रधान मोदींनी चालवलेले कार्यक्रम, त्यांनी राबविलेल्या धोरणांवर लोकांनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशातील जनतेने पूर्ण आशीर्वाद दिला आहे. आम्ही दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल करत आहोत. ज्यांनी पूर्वी तिथे भीतीचे वातावरण निर्माण केले तेच आज घाबरले आहेत. यासाठी आम्ही योगीजींचेही आभार मानतो.लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणूस सक्षम होतो, तेव्हा तो सामान्य माणूस निवडणुकीत कमळ चिन्हाचे बटण दाबतो. पंतप्रधानांनी भारतातील राजकारणाची संस्कृती बदलली आहे. आता रिपोर्ट कार्डच्या राजकारणावर निवडणुका लढवल्या जातात असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत