नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाला राजपथावर निघालेल्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून ( tableau of Republic Day parade 2022 ) काशी विश्वनाथ धामची झलक दाखवण्यात आली होती. या चित्ररथाची यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून निवड करण्यात आलीय. यामध्ये प्राचीन शहरांचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित करण्यात आली होती. राजपथावरील उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची उत्पादने दाखवण्यात आली होती. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगरी पुरस्कार ( popular choice category ) महाराष्ट्रला मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ( independence day 2021 ) राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ (Tableau Of Maharashtra ) नेहमीच आकर्षक ठरला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या चित्ररथाने अनेकांची मने जिंकून घेतली.
महाराष्ट्र सरकारने यंदा ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही जंगलची दुनिया चित्ररथावर साकारण्यात आली होती. तर, या चित्ररथाचं समालोचन बीग बी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.
सुरुवातीला महाराष्ट्राच्या चित्ररथाला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांतच आपला हा निर्णय मागे घेत महाराष्ट्राच्या चित्ररथाला राजपथावरील संचलनात सहभागी होण्याची परवानगी दिली होती.