लखनौ :भरधाव बोलेरोने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी घडली आहे. मृत नागरिक वीजेचा धक्का लागलेल्या मुलाला रुग्णालयात नेत असताना हा अपघात झाला. यावेळी पाच जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर दोन जण रुग्णालयात नेताना दगावले. या अपघातातील गंभीर जखमी तरुणाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. कल्लू, त्याची आई सायराबानो, कैफ, मुसाहिद, साकीर, जाहिल आणि चालक हसिम अशी अपघातात ठार झालेल्या नागरिकांची नावे आहेत. तर जाहिलची प्रकृती चिंताजनक आहे.
बोलेरोमध्ये अडकले मृतदेह :उभ्या ट्रकला धडकल्यानंतर बोलेरोचा चक्काचूर झाला असून बोलेरोमध्ये बसलेल्या नागरिकांचे मृतदेह बोलेरोमध्येच अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बोलेरोला गॅस कटरने कापावे लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. विभागीय आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षकांनीही जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली.
कटरने बोलेरो कापून बाहेर काढले मृतदेह :तिलौसा गावातील मुलाला वीजेचा धक्का लागल्याने त्याला बांदा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे आठ जण जात होते. यावेळी बाबेरु परिसरातील कमासीन रोड परैया दाई परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला ही भरधाव बोलेरो कार जाऊन धडकली. रात्री साडेनऊ बाजता घडलेल्या या घटनेची माहिती रस्त्यांनी जाणाऱ्या नागरिकांनी कमासीन पोलीस ठाण्यात दिली. बाबेरु पोलीस ठाण्याचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. मात्र मृतदेह बोलेरो कारमध्ये अडकले होते. त्यामुळे बोलेरोमध्ये अडकलेल्या नागरिकांना गॅस कटरने बोलेरो कापून बाहेर काढण्यात आले. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बाबेरू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले.
उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू :या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला बाबेरू प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी दुर्गाशक्ती नागपाल आणि पोलीस अधीक्षक अभिनंदन यांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवून अपघातस्थळाची पाहणीही केली. तर आयुक्त आर. पी. सिंग आणि डीआयजी यांना घटनेची माहिती मिळताच तेही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. सीएचसीमधून आणलेल्या दोन जखमींपैकी फक्त एकाचा मृत्यू झाला. जखमींपैकी एकाला डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहे.