नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यातील 55 मतदारसंघात मतदान सुरू आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनएनआयला मुलाखत ( CM Yogi Adityanath's interview ) दिली आहे. यात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले असून राज्यात पुन्हा भाजपाच सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. हिबाजवर ( CM Yogi on Hijab Controversy ) बोलताना ते म्हणाले, की शाळेचे काही नियम असतात, ते पाळले गेले पाहिजेत. मी उत्तर प्रदेशमध्ये सर्वांना भगवे कपडे घालण्याचा आदेश देऊ शकतो का?, असा सवाल त्यांनी केला.
नुकतेच योगी आदित्यनाथ यांच्या '80% विरुद्ध 20%' टिप्पणीमुळे वादाला तोंड फुटले होते. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत योगींनी आपल्या '80-20' टिप्पणींवर स्पष्टीकरण दिले. 'धर्म-जात' संदर्भात ते विधान नव्हते. तर 20 टक्के विरुद्ध 80 टक्के म्हणजे, 80 टक्के लोक प्रगतीचे समर्थन करतात तर 20 टक्के लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि नकारात्मक विचार करतात, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी इतर कोणाचीही गरज नसून त्यास काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी हे दोघेच पुरेसे आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि जनतेच्या आशीर्वादाने राज्यात डबल इंजिनचे सरकार दुसऱ्यांदा परत येत आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे पहिल्या टप्प्यानंतर बॅकफुटावर गेले असल्याचे योगींनी म्हटलं.