बेंगळुरू ( कर्नाटक ) : कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, पत्नीचा एटीएम म्हणून कोणत्याही भावनिक जोडणीशिवाय वापर करणे म्हणजे मानसिक छळ आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान हे निरीक्षण ( HC on Wife divorce petition ) नोंदवले. त्याचवेळी न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत या प्रकरणात पत्नीच्या घटस्फोटाला मान्यता दिली.
खंडपीठाने सांगितले की, पतीने व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने पत्नीकडून 60 लाख रुपये घेतले होते. त्याने तिला एटीएम मशीन मानले. त्याला पत्नीशी भावनिक ओढ नाही. पतीच्या वागणुकीमुळे पत्नीला मानसिक आघात झाला आहे. न्यायालयाने म्हटले की, 'या प्रकरणात पतीकडून पत्नीवर येणारा ताण हा मानसिक छळ मानला जाऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करण्यात कौटुंबिक न्यायालय अपयशी ठरले आहे. त्या न्यायालयाने याचिकाकर्त्या पत्नीचे म्हणणे ऐकले नाही किंवा तिचे म्हणणेही नोंदवले नाही. “पत्नीचा युक्तिवाद लक्षात घेऊन तिच्या घटस्फोटाच्या याचिकेला परवानगी देण्यात आली आहे,” असे खंडपीठाने स्पष्ट केले.