नवी दिल्ली:भारतीय लष्कराच्या तीन प्रमुख सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) मधील एकूण स्टोरेज स्पेसपैकी जवळपास एक तृतीयांश जागा भारतीय सैन्याने वापरता येत नसलेल्या किंवा निरुपयोगी वस्तूंनी भरलेली आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालात (CAG) ही बाब समोर आली आहे. नुकताच याबाबतचा अहवाल लोकसभेत मांडण्यात आला.
आग्रा, देहू रोड आणि किरकी (दोन्ही महाराष्ट्रातील पुण्याजवळ) येथील तीन सीओडीचा लेखापरीक्षणाच्या अहवालात समावेश केला आहे. त्यात 2014 पासून पाच वर्षांच्या कालावधीत ऑटोमेशन, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, अंतर्गत नियंत्रण इत्यादी डेपोतील प्रक्रियांचा समावेश होता. 2014-15 ते 2018-2019 या पाच वर्षांच्या कालावधीत 2019-20 साठी तीन CODs मध्ये काय तरतूदी करण्यात आल्या त्याबाबतचा तपशील या अहवालात देण्यात आला आहे.
आश्चर्यकारक बाब म्हणजे या 'निरुपयोगी' वस्तू डेपोमधली महत्वाची जागा व्यापतात. तर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांना आवश्यक असलेल्या वस्तू मात्र उपलब्ध नाहीत. COD चे मुख्य उद्दिष्ट हे आहे की कार्यक्षम आणि प्रभावी लढाऊ शक्ती युनिट्स योग्यवेळी योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी आणि योग्य किमतीत देण्याची क्षमता ठेवणे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामुग्री उपलब्ध करून देणे.