जो बायडेन यांचा भारत दौरा नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं दिल्लीत आगमन झालय. ते जी २० परिषदेच्या निमित्तानं भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बायडेन यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे स्वागत करण्यासाठी भारतानं पूर्ण तयारी केलीय. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मुक्कामाची व्यवस्था भारत सरकारनं दिल्लीतील आयटीसी मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये केलीय. हॉटेलमध्ये आणि हॉटेलभोवती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
अशी आहे सुरक्षा व्यवस्था-हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर बायडेन यांच्या सुरक्षेसाठी असलेले खास कमांडो तैनात करण्यात आले आहेत. याच हॉटेलमध्ये आजवर भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे तत्कालीन जॉर्ज डब्ल्यु. बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांनी मुक्काम केला होता. त्यांना बेडरूमच्या प्रेसिडेंशियल सूटमध्ये नेण्यासाठी विशेष लिफ्टची व्यवस्था करण्यात आलीय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेत अमेरिकेच्या सरकारकडून जगातील सर्वात महागड्या बुलेटप्रुफ महागड्या गाड्या असतात. याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रे, बॉम्ब शोधक यंत्रे, नियंत्रण कक्ष अशी समांतर सुरक्षा यंत्रणादेखील असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडने यांच्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या मुद्द्यावर होऊ शकते चर्चा
- लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांवरील संभाव्य करार करणे.
- भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम
- भारत-अमेरिकामधील ड्रोन करारावर चर्चा
- जेट इंजिनांशी संबंधित संरक्षण कराराला अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी
- युक्रेनमध्ये मानवतावादी सहाय्य आणि नवीन वाणिज्य दूतावासाची स्थापना
- लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर भारताने लादले निर्बंध
भारताच्या दौऱ्यासाठी उत्साही-व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जो बायडेन हे भारताच्या दौऱ्यासाठी उत्साही आहेत. मात्र, भेटीदरम्यान ते कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणार आहेत. त्यांच्या पत्नी तथा अमेरिकेच्या फर्स्ठ लेडी जिल बायडेन यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोनवेळा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये संसर्ग झाला नसल्याचं दिसून आले.