नवी दिल्ली - एका दशकाच्या प्रतिक्षेनंतर अखेर दोन ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणखी वाढले आहे. महासागरात चीनचा वाढती ताकद पाहता भारताने अमेरिकन कंपनी लॉकहिड मार्टिनसोबत हेलिकॉप्टरसाठी करार केला होता. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते. ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ आतापर्यंतचं सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर आहे. लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळणारी फिचर्स यात आहेत. अमेरिकन सैन्यात याचा वापर पूर्वीपासूनच सुरू आहे.
अमेरिकेच्या एनएएस नॉर्थ आयलंडमधील नौदलाच्या हवाई तळावर दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली. या कार्यक्रमाला भारताकडून अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू आणि नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल रवनीत सिंह उपस्थित होते. या हेलिकॉप्टरच्या निमित्ताने भारत आणि अमेरिका यांच्यातील विश्वासाचे आणि मैत्रीचे नाते अधिकाधिक दृढ झाल्याचे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू म्हणाले.