वॉशिंग्टन :आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युनायटेड स्टेट्स ज्युरींनी चांगलाच धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 1990 च्या दशकात अमेरिकेच्या आघाडीच्या लेखिकेच्या लैंगिक शोषणप्रकरणी दोषी आढळल्याचा निकाल या ज्युरींनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत या लेखिकेची बदनामी केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्युरींनी दिलेल्या या निकालाचा परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2024 च्या आगामी निवडणुकीच्या प्रचारावर होऊ शकतो. मॅनहॅटन फेडरल न्यायालयात मंगळवारी दुपारी हा निकाल देण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचारासाठी डोनाल्ड ट्रम्प दोषी :अमेरिकेतील आघाडीच्या लेखिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 1990 साली लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. न्यूयॉर्क शहरातील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये हा प्रकार घडल्याचेही या लेखिकेने आपल्या तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर तिचे आरोप फेटाळून लावत पीडितेची बदनामी केली होती. नऊ सदस्यांच्या ज्युरीने मंगळवारी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या लेखिकेवर बलात्कार केला नाही. परंतु लैंगिक अत्याचार आणि बदनामी केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवला आहे. या ज्युरींनी पीडितेला 50 लाख डॉलर्स नुकसान भरपाई देण्याचेही नमूद केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प देणार निकालाला आव्हान :अमेरिकेच्या ज्युरींनी डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषणप्रकरणी दोषी आढळल्यानंतर 50 लाख डॉलर्स नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला डोनाल्ड ट्रम्प हे आव्हान देणार आहेत. हे दिवाणी प्रकरण असल्याने ट्रम्प यांना कोणत्याही गुन्हेगारी परिणामांना सामोरे जावे लागणार नाही. डोनाल्ड ट्रम्प हे अपील करणार असल्याचे त्यांचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी मंगळवारी सांगितले. याचा अर्थ जोपर्यंत या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जात आहे, तोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही. मंगळवारी निकाल जाहीर होताच पीडित लेखिकेने समाधान व्यक्त करत कोर्टातून बाहेर पडली.
अखेर जगाला सत्य कळले आहे :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित लेखिकेने निकालानंतर समाधान व्यक्त केले. माझे नाव साफ करुन जीवन परत मिळवण्यासाठी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. आज अखेर जगाला सत्य कळले आहे. हा विजय फक्त माझाच नाही तर प्रत्येक स्त्रीचा आहे. ज्या स्त्रियांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांच्यासाठी हा विजय महत्वाचा आहे. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प ज्युरीसमोर हजर झाले नाहीत. निकालानंतर त्यांच्या सोशल मीडिया साइटवर दिलेल्या निवेदनात डोनाल्ड ट्रम्प यांनी पीडित लेखिकेला ओळखत नसल्याचे नमूद केले आहे.