हैदराबाद- भारतामध्ये सरकारी आकडेवारीच्या तुलनेत १० पट अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत? असा दावा करणारी आकडेवारी एका अमेरिकन संस्थेने जाहीर केली आहे. या संस्थेच्या माहितीनुसार भारतात कोरोनाने सुमारे ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने जगभरातील कोरोनाने मृत्यू झालेली आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज आणि घरांमधील सर्वेक्षणानुसारची आकडेवारीचा समावेश आहे. या अहवामध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालाच्या लेखकामध्ये मोदी सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचादेखील समावेश आहे.
अहवालानुसार भारतात कोरोनाने ३४ ते ४७ लाखांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाच्या मृत्युची आकडेवारी ४.१४ लाख आहे. याचा अर्थ सरकारी आकडेवारीच्या तुलनेत अहवालातील आकडेवारी ही १२ पटीने जास्त आहे. स्वातंत्र्य आणि भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर देशातील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
हेही वाचा-माळीण फाटा येथे 15 कोटी खर्चूनही खचला रस्ता! बारा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
सरकारी आकडेवारीबाबत संशय
एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला होता. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा नव्हती. देशात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंत भारतात कोरोनाने ३४ लाख ते ४७ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहवालात करण्यात आला आहे.