सीधी (मध्य प्रदेश) : भाजपच्या नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्या प्रकरणी आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी सिधी जिल्हा पोलिस आणि महसूल विभागाचे पथकाने आरोपी भाजप नेत्याच्या घरावर बुलडोझर चालवले आहे. प्रशासनाची टीम घरी पोहोचताच भाजप नेत्याची आई बेशुद्ध पडली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपीची आई बेशुद्ध पडली : प्रशासनाचे पथक जेसीबीसह पोहोचताच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या पथकात सुमारे 100 पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. बुलडोझर सुरू होताच आरोपीची आई बेशुद्ध पडली. प्रशासनाच्या या कारवाईवरून आरोपीच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र यात आमचा काय दोष आहे? असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांचे ट्विट : सीधी येथे आदिवासी तरुणावर भाजप नेत्याने लघवी केल्याच्या प्रकरणाने चांगलाच पेट घेतला आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, 'भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत. मध्य प्रदेशातील एका भाजप नेत्याच्या अमानुष वागणुकीने संपूर्ण मानवतेला काळीमा फासला आहे. ही भाजपची आदिवासी आणि दलितांबद्दलची वृत्ती आहे'.