यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात प्रदर्शन नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर भागात कडाक्याच्या थंडीत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. (upsc students protest in delhi). आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोविडमुळे ज्याप्रमाणे इतर परीक्षांमध्ये एक अतिरिक्त प्रयत्न करण्याची मुभा देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे त्यांनाही ही सुविधा देण्यात यावी. (students demand extra attempt for exam). मात्र आपल्या मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवले. याशिवाय काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार : राजेंद्र नगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा संप सुरू आहे. येथील परीक्षार्थीं वर्षभरापासून या मागणीसाठी वारंवार उपोषण करत आहेत. आमचे शांततापूर्ण आंदोलन दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. त्यांना येथून हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पोलीस विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवत आहेत. पोलिस एका विद्यार्थ्याला हातपाय धरून जबरदस्तीने तेथून दूर नेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईला विद्यार्थ्यांनीही विरोध केला आहे.
लोकप्रतिनिधींकडून पोकळ आश्वासन : विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीमुळे परीक्षा उत्तीर्ण होण्याचे आमचे प्रयत्न कमी पडले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आम्ही परीक्षेची तयारी करू शकलो नाही. म्हणूनच आम्ही यूपीएससी परीक्षेसाठी सरकारकडून अतिरिक्त प्रयत्नांची मागणी करत आहोत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही आणि आम्हाला अशी वागणूक दिली गेली तर उद्याही आम्ही आंदोलन करू. आम्ही आता शांततेत कँडल मार्च काढून आमच्या मागणीसाठी आंदोलन करत राहू. आपल्या मागण्यांबाबत लोकप्रतिनिधींकडेही गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आश्वासनाऐवजी काहीच केले नाही. आम्ही आतापर्यंत विविध प्रदेशातील 100 हून अधिक खासदार आणि आमदारांना भेटलो आहोत, मात्र त्यांनी अद्याप आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत, असे विद्यार्थी म्हणाले.
ट्वीटरद्वारे दिल्ली पोलिसांवर टीका : याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की UPSC चे विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. उद्या ही मुलं आयएएस, आयपीएस होऊन देश चालवतील. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्याशी चर्चा करावी. आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील याप्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, यूपीएससीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी धरणे धरत आहेत मात्र मोदींचे पोलीस त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप म्हणजे गुन्हेगारी आणि अत्याचार. दडपशाही हे या सरकारचे पहिले पाऊल असल्याचे, योगेंद्र यादव यांनी लिहिले आहे. प्रशांत कमल यांनी लिहिले की, "शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या उमेदवारांचे तंबू पाडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बंद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिस शांतताप्रिय आंदोलकांशी असेच वागतात".