नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला. ज्यामध्ये इशिता किशोर अव्वल ठरली आहे. ग्रेटर नोएडातील जलवायू विहार येथे राहणारी इशिता या यशानंतर खूप आनंदी आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. निकाल लागताच तिच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची गर्दी झाली आहे.
'टॉप करण्याचे कोणतेही सूत्र नाही' : ईटीव्ही भारतशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले, की मी कठोर परिश्रम आणि दररोज सुमारे 8 तास अभ्यास केल्यानंतर या टप्प्यावर पोहोचली आहे. प्रथम क्रमांक मिळवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पालकांनी मला अभ्यासासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतरच मी हे स्थान मिळवू शकले आहे. प्रत्येकजणच कठोर परिश्रम करतो आणि प्रत्येकालाच प्रथम स्थान मिळवायचे असते. मात्र यासाठी कोणतेही सूत्र नाही. दररोज तुम्हाला तुमच्या चुकांमधून धडा घ्यावा लागतो आणि ज्या काही उणिवा बाहेर येतील त्या सुधारायच्या असतात.
'कुटुंबाने कायम पाठिंबा दिला' : इशिता पुढे म्हणाली की, माझ्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला जाऊ शकत नाही. माझ्यासाठी माझे संपूर्ण कुटुंब गुरू असून त्यांच्या मेहनतीमुळेच मला देशात प्रथम क्रमांक मिळाला. माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. जरी मी दोनदा प्रिलिम्स क्लियर केले नाही तरीही त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांनी ज्या प्रकारे मला पुढे केले आणि माझ्यासाठी गोष्टी सुलभ केल्या त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन.