नवी दिल्ली - युपीए अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची सुरूवात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळणार असेल तर त्याचा आनंदच आहे. तसा प्रस्ताव आल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रीया देत ही चर्चा तथ्यहिन आणि खोटी असल्याचे म्हटले होते. त्यात आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी उडी घेतली आहे. युपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नव्हे असे त्यांनी पवारांनी सुनावले. या बाबत नक्की काय घडामोही घडल्या त्याचा घेतलेला हा आढावा.
काय म्हणाले होते संजय राऊत -
देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिले जात नाही. भाजपाची तानाशाही सुरु आहे. या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवे”, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. देशात विरोधी पक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणत त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिश्मा शरद पवारांनी केला तसाच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद जाणार असेल तर शिवसेनेला आनंदच होईल. तसा कोणता प्रस्ताव आल्यास शिवसेना त्यास पाठिंबा देईल असेही ते म्हणाले होते.
शरद पवारांचे स्पष्टीकरण -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीएचे नेतृत्त्व करतील, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. माध्यमांतूनही यासंदर्भातील बातम्या आल्या आहेत. मात्र, ह्या सर्व बातम्या खोट्या असून अशा बातम्या देत जाऊ नका, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. युपीए अध्यक्ष होणार अशी कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
काँग्रेसचे प्रत्युत्तर -
राऊत यांच्या या मागणी नंतर त्याच्या प्रतिक्रिया काँग्रेसमध्येही उमटल्या. शिवसेना युपीएमध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी युपीएच्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करु नये, असा इशाराही चव्हाण यांनी दिला होता. तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांना संपवण्यासाठी जे अभियान सुरू आहे, त्याचाच हा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता. राहुल गांधी यांचे काँग्रेस पक्षातील अस्तित्व संपवण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पुन्हा सामनातून निशाणा -
मात्र यानंतरही राऊत थांबले नाहीत. सध्याची विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकडय़ा अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. देशासाठी हे चित्र बरे नसून काँग्रेस नेतृत्वाने याचा विचार केला नाही तर येणारा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे. त्यामुळे ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल, असे सांगत त्यांनी युपीए नेतृत्व बदलाचीच एक प्रकरे मागणी केली.
सुशीलकुमार शिंदेनेही दिले पवारांना समर्थन -
शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष झाल्यास आपल्यालाही आवडेल असे काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. आजही देशाचे नेतृत्व पवार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ५० वर्षांत पवार यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना अनेकांनी त्रास दिला. मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, असेही शिंदे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे पवार. पवारांनीच मला राजकारणात आणलं आणि मोठं केले, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांचे कौतुक केले.
पवार महाराष्ट्रातचे नेते होवू शकले नाहीत...
शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार ही त्यांच्या बगलबच्यांनी पिकवलेली कंडी आहे. उद्या मी म्हणेल की, मला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्यात काही रस नाही. त्याच पद्धतीने शरद पवार देखील म्हटले आहेत की, मला यूपीएचे अध्यक्ष होण्यात काही रस नाही. त्यामुळे शरद पवार काही युपीएचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत, ते कधी उभ्या महाराष्ट्राचे नेते झाले नाहीत, अशी खोचक टीका भाजपा आमदार अतुल भातखलकर यांनी केली.
पी. चिदंबरम यांचा टोला -
या सर्व चर्चांवर काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुर्ण विराम दिला आहे. युपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. शिवाय पवार स्वत:च युपीएचे अध्यक्ष होवू इच्छितात असे मला वाटत नाही. कारण तशी काही स्थितीच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युपीएच्या घटक पक्षांच्या बैठका आणि रणनितीसाठी ज्या बैठकी होतात त्याचे अध्यक्षपद हे आपोआपच आघाडीतील मोठ्या पक्षाकडे येते. शिवाय हे काही पंतप्रधानपद नाही जे आपण निवड करत आहोत असा टोलाहीत्यांनी लगावला आहे. त्यांनी युपीएच्या अध्यक्षपदाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
हेही वाचा -देशातील पहिली चालकविरहीत मेट्रो आजपासून दिल्लीत धावणार