चंदीगड :मदरशात शिक्षण घेणाऱ्या बालिकेवर मौलानाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना करनाल जिल्ह्यातील शामली शहरात घडली आहे. या नराधमाने मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. पीडितेच्या आरोपानंतर 'बाल कल्याण समिती'ने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली.
'बाल कल्याण समिती'च्या माध्यमातून मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. आम्ही शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करुन प्रकरण पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. प्रकरण उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्याचे आहे, त्यामुळे पुढील कारवाई त्यांच्याकडून लगेच करण्यात येईल. - सुरेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, करनाल
शामलीतील मदरशात 20 जूनला गेली होती पीडिता :उत्तर प्रदेशातील ही बालिका 20 जूनला करनाल जिल्ह्यातील शामली येथील मदरशात शिकण्यासाठी गेली होती. यावेळी दहा दिवस झाल्यानंतर मदरशातील मौलानाने तिला आपल्या जवळ बोलावून आक्षेपार्ह कृत्य केले. मात्र याला पीडितेने विरोध केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या नराधमाने पीडितेवर चार ते पाच तास अत्याचार केल्याची माहिती पीडितेने बाल कल्याण समितीला दिल्याचे बालिकेच्या नातेवाईकांनी सांगितले.