बाराबंकी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका भावाने आपल्या सख्या बहिणीचा कोयत्याने शिरच्छेद केला. यानंतर तो तिचे शीर हातात घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाला. त्याच्या एका हातात कोयता होता, तर दुसऱ्या हातात मुंडके होते. त्या कापलेल्या मुंडक्यातून रक्त जमिनीवर टपकत होते. हे दृश्य पाहून ग्रामस्थ हादरले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रस्त्यावरून अटक केली.
शीर धडापासून वेगळे केले : या प्रकरणी अतिरिक्त एसपी आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, फतेहपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील मिठवारा गावात ही घटना घडली आहे. शुक्रवारी गावात राहणाऱ्या रियाज आणि त्याची सख्खी बहीण असिफा यांच्यात वाद झाला. यानंतर रियाज कुठेतरी गेला. काही वेळाने तो परतला. यानंतर त्याने असिफाला कपडे धुण्यास सांगितले. असिफा कपडे धुण्यासाठी पाणी भरत होती, त्याच दरम्यान रियाजने कोयत्याने असिफाचा शिरच्छेद केला. यानंतर ते कापलेले शीर घेऊन तो पोलीस ठाण्याकडे रवाना झाला.
नियोजन करून हत्या केली :हे धक्कादायक दृश्य पाहून गावकऱ्यांना हादरा बसला. त्यांनी याबाबत फतेहपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रियाजला अटक केली. त्याच्याकडून कापलेले शीर आणि कोयता जप्त करण्यात आला. बहिणीची हत्या केल्यानंतर रियाजच्या चेहऱ्यावर थोडासाही खेद दिसत नव्हता. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रियाझने नियोजन करून ही हत्या केली. रियाज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. तो भाजीचा स्टॉल चालवतो. मारहाणीच्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला होता. १५ दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला आहे.
म्हणून केली हत्या : रियाजची बहीण असिफा 25 मे रोजी शेतात गेली असताना गावातील एक तरुण चांद बाबू याचा मुलगा जान मोहम्मद याने तिला पळवून नेले होते. असिफा अनेक दिवस न सापडल्याने तिच्या वडिलांनी 29 मे रोजी फतेहपूर कोतवाली येथे चांद बाबूसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी असिफचा शोध घेतला, आणि चांद बाबूला तुरुंगात पाठवले. सध्या तो तुरुंगात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफाच्या या कृत्याचा रियाजला राग होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. बहिणीच्या या कृत्याने आपला अपमान झाल्याचे रियाझला वाटत होते. यामुळे त्याने बहिणीची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
- Satara Crime News : पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे घरात आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात?
- Nagpur Crime : खुनाच्या दोन घटनांनी हादरले नागपूर, एक गंभीर
- doctor killed his father : डॉक्टर मुलानेच केला बापाचा खून, आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल