हैदराबाद - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्याने तेथील परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदेने(युएनएस) आज आपत्कालीन बैठक बोलाविली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत 5 कायमस्वरुपी देश आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीनचा समावेश आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी झमीर काबुलोव्ह यांनी यांनी माध्यमांशी बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तालिबानींनी रशिया आणि इतर देशांना सुरक्षा मोहिम सुरू ठेवण्याची परवानगी देऊ, असे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. काबुलमधील दुतावास कार्यालय रिकामे करण्यात येणार का, याबाबतही त्यांनी पुष्टी दिली नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक महत्त्वाची-
तालिबानी हे अफगाणिस्तानमध्ये सत्तेचा दावा करणार आहेत. अशा स्थितीत युएनएसची आपत्कालीन बैठक ही महत्त्वपूर्ण असणार आहे. जगभरातील 193 जागतिक संस्थांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. असे असले तरी तालिबानींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतकार्यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे काबुलमध्ये 2002 पासून कार्यालय आहे. ते उनामा नावाने ओळखले जाते.
हेही वाचा-'...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; अफगाण तालिबानचा भारताला इशारा
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गटेरर्स यांना अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चिंता-
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या परिस्थितीमुळे शेकडो नागरिकांना पळून जाण्यास भाग पडले आहे. तर मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. सर्व अत्याचार थांबवायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क विशेषत: महिला आणि मुलींना अत्यंत कष्टाने मिळालेल्या अधिकारांचे जतन करायला पाहिजे. मला अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चिंता वाटत आहे. तालिबानी आणि इतरांना माझी विनंती आहे, त्यांनी लोकांच्या प्राणाचे संरक्षण करावे व मानवी हक्कांची खात्री द्यावी. अफगाणिस्तानमध्ये शांततापूर्ण तडजोडी आणि सर्व अफगाणिस्तानी नागरिकांकरिता मानवी हक्कांना चालना देण्याकरिता योगदान देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केले आहे.