नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून कागदपत्रे हिसकावून फाडल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. शांतनु सेन यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित केले आहे. कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशनात 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. मात्र, विविध मुद्यांवरून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे.
गुरुवारी सभागृहात पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव हे पेगासस मुद्यांवरून निवेदन देते होते. तेव्हा तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावली आणि फाडत ती पीठासीन उपसभापतींच्या आसनाकडे भिरकावली. यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.