नवी दिल्ली -गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देश समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत भारत आणि चीनदरम्यान तब्बल चर्चेच्या 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. आज पुन्हा कमांडर पातळीवर चर्चेची तेरावी फेरी सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्डो या ठिकाणी सुरू झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती कायम आहे.
भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. लडाखमध्येच नाही तर अरुणाचलमध्येदेखील चीनच्या कारवाया सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय आणि चिनी सैनिकांत चकमक झाल्याचे वृत्त होते. यावर 28 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यानगत्से नियंत्रण रेषेजवळ ड्युटीवर असलेल्या चीनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतल्याचे माहिती समोर आली होती. हे वृत्त चीनने फेटाळले. दोन्ही सैनिक आमने-सामने आले होते. मात्र, भारताने पीएलए सैन्यांना ताब्यात घेतले नसल्याचे पीएलए स्रोताच्या हवाल्याने चीनी माध्यमांनी म्हटलं.
घटना तोडून-मोडून दाखवण्यात येत आहे. असे करणे हे द्विपक्षीय कराराचे उल्लंघन असून यास जबाबदार पूर्णपणे भारत असेल. भारताने द्विपक्षीय कराराचे पालन करावे आणि आपल्या सैन्यांवर नियंत्रण ठेवावे. तसेच सीमा भागात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी चिनी सैन्याबरोबर काम केले पाहिजे, असे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) म्हटलं.
घटनेचे वर्णन करताना पीएलए स्रोताच्या हवाल्याने चीनी माध्यमांनी म्हटलं, की पीएलए सैन्यांनी 28 सप्टेंबर रोजी चीन-भारतीय सीमेवरील चीनच्या डोंगझांग भागात नियमित गस्त घातली. यावेळी भारतीय सैन्यांनी अवास्तव अडथळा निर्माण केला. याचा चिनी अधिकारी आणि सैनिकांनी कठोरपणे प्रतिकार केला आणि गस्त मिशन पूर्ण करून माघारी फिरले. डोंगझांग क्षेत्र चीनचा मूळ प्रदेश आहे. त्यामुळे आपल्या प्रदेशात गस्त घालणे हे पूर्णपणे वाजवी आणि कायदेशीर आहे. चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या पूर्णपणे बनावटी आहेत, असेही चीनने म्हटलं.