नवी दिल्ली - हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाला हिरवा कंदील दाखवला आहे. पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 12 हजार कोटींचा चुना लावून सध्या लंडनमध्ये राहत असलेला हा मोदी यातून वाचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाला २५ फेब्रुवारीला तेथील न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी त्याबाबत परवानगी देणे आवश्यक होते. प्रत्यर्पणाला गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिली आहे. नीरव मोदीला लंडनमध्ये 19 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. पीएनबीमधील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) त्याची चौकशी करत आहे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात सक्तवसुली संचलनालय (ईडी) चौकशी करत आहे.