बंगळुरु : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी हे गुरूवारी एका शहीद जवानाच्या ऐवजी एका जीवित जवानाच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याचेही आश्वासन दिले होते. हे सर्व स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे झाले असे बोलले जात आहे.
जायचे होते हुतात्मा जवानाच्या घरी आणि पोहचले....!
केंद्रात नेमकेच मंत्री झालेले नारायणस्वामी हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यात 'जन आशीर्वाद यात्रा' करत आहेत. भाजपा सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना पुण्यात एक वर्षापूर्वी शहीद झालेले बसवराज हिरेमठ यांच्या घरी जायचे होते. मात्र, कार्यकर्ते त्यांना रविकुमार कट्टीमनी या जीवित जवानाच्या घरी घेऊन गेले. कट्टीमनी हे सध्या जम्मू-कश्मिरमध्ये कार्यरत आहेत.
जवानाचे कुटुंबीय हैरान -
मंत्र्यांच्या यात्रा दौऱ्यानुसार, त्यांना शहीद जवानाच्या परिवाराला भेटायचे होते आणि सांत्वना द्यायची होती. मात्र, नारायणस्वामी हे खासदार शिवकुमार उदासी यांच्यासोबत जिल्ह्यातील मुलागुंड येथे उशिरा पोहोचले आणि त्यातच त्यांना कट्टीमनी यांच्या घरी नेण्यात आले, या सर्व प्रकाराने जवानाच्या घरचे ही हैरान झाले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.