डेहराडून : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी उत्तराखंड सरकारकडून करण्यात येत असलेल्या समान नागरी संहिता कायद्याचे समर्थन ( Uniform Civil Code in Uttarakhand ) केले. केंद्र सरकारही हा कायदा लवकरच आणू शकते, असेही त्यांनी सांगितले. आठवले म्हणाले की, 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाल्यापासून समान नागरी कायदा असावा, अशी जनतेची मागणी आहे. जनतेची मागणी असेल तर समान नागरी कायदा असावा, अशी सरकारची भूमिका असल्याचे ते म्हणाले. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. हा कायदा देशाच्या हितासाठी आहे. त्यामुळे भारत सरकार लवकरच समान नागरी कायदा आणू ( Ramdas Athwale On Uniform Civil Code ) शकते.
लोकसंख्येवर येणार नियंत्रण :केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले की, यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण येऊ शकते आणि हा कायदा मुस्लिमांच्या विरोधातही नाही. ते म्हणाले की, मुस्लीम समाजही आपला समाज आहे. ते म्हणाले की, आपला इतिहास असा आहे की, अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या वेळी सर्वजण बौद्ध झाले आणि शंकराचार्यांच्या आगमनानंतर देश हिंदू बहुसंख्य झाला आणि मुघलांच्या आगमनानंतर हिंदू बहुसंख्य समाजाचे धर्मांतर होऊन काही समाज मुस्लिम झाला. आठवले म्हणाले की, बौद्ध मंदिरांची जागा हिंदू मंदिरांनी घेतली आणि हिंदू मंदिरांची जागा मशिदींनी घेतली.