पाटणा : बिहारमधील महाआघाडीत सध्या नाराजीचे वातावरण आहे. विरोधी आघाडीच्या 'INDIA' या नावाने नितीश कुमार नाराज आहेत. तर मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने काँग्रेस नाराज आहे. दुसरीकडे, ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये नितीश कुमारांच्या अडथळ्यांमुळे राजद नाराज आहे. तर शिक्षक नियमावली आणि कटिहार गोळीबारामुळे डावे संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत. तेथे त्यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्याने आणखी खळबळ उडाली आहे. 'नितीश कुमार कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू नये', असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
आठवलेंची नितीश कुमारांना साद : रामदास आठवलेंनी नितीशकुमारांच्या कामांची प्रशंसा केली आहे. त्यांनी बिहारमधील चांगल्या रस्त्यांचे कौतुक केले आहे. तसेच INDIA नावाला विरोध असल्याने विरोधी पक्षांच्या बंगळुरू बैठकीतून बाहेर पडण्याच्या नितीश कुमारांच्या निर्णयाचेही आठवलेंनी कौतुक केले आहे. नितीश कुमार यांनी यापुढे मुंबईतील सभेला जाऊ नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
नितीश कुमार बंगळुरूमध्ये राहुल गांधी यांनी दिलेल्या INDIA नावाचा निषेध करत बैठकीतून बाहेर पडले. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आता मुंबईत विरोधी ऐक्याच्या बैठकीला जाऊ नये. नितीश यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. अटलजींच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री असताना माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. नितीश यांना माझा एकच प्रश्न आहे की, जेव्हा त्यांना राजदसोबत जायचे होते तेव्हा ते आमच्यासोबत का आले होते? जे आमच्यात सामील होतात ते भ्रष्टाचार मागे सोडतात. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री